'जय हिंद' लिहून तो राजा अमर झाला; असा एक राजा, ज्याचा कारभार केवळ 89 दिवसांचा
अनिल ठाकरे | चंद्रपूर : भारताच्या इतिहासात असा एक राजा झाला ज्याचा राज्यकारभार केवळ 89 दिवसांचा ठरला. मात्र, या कमी दिवसात राजाने अशी कृती केली की त्याचे नाव इतिहासात अमर झाले. आपल्या राज्यातील सोने, चांदी आणि तांब्याच्या चलनावर या राजानं 'जय हिंद' कोरलं. या राजाचे नाव आहे महाराज मदन सिंह.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभरात उत्साहानं साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शहिदांनी बलिदान दिलं. त्यांचे स्मरण स्वातंत्र्य दिनी केलं जाते. याच वेळी भारत देशातील एका राजाचे स्मरण न कळत होते. तसं बघितलं तर या राजाचे स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही. मात्र, या राजाच्या एका कामगिरीने इतिहासात राजाचे नाव ठळक अक्षरात लिहीलं गेलं आहे.
गुजरात राज्यातील कच्छ येथील जाडेजा राजघराण्यातील महाराव मदन सिंह यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1909 आणि मृत्यू 21 जून 1991रोजी झाला. त्यांच्या मालकीचे शरदबाग, पराग महल आणि आयना महल हे तीन महाल त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंसह ट्रस्टमध्ये रूपांतरित केले आणि ते लोकांसाठी खुले केले. विजयराज जाडेजा यांचा मृत्यू 26 जानेवारी 1948 साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मदन सिंह राजा झाले.
मदन सिंह यांचा कार्यकाळ 26 फेब्रुवारी 1948 ते 1 जून 1948 असा आहे. अवघे 89 दिवस ते राजा राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली संस्थानांचे विलनीकरण झाले. या विलनीकरणा दरम्यान विजयराल जाडेजा यांच्या मृत्यूमुळे कच्छ विलनीकरण राहून गेलं. त्यानंतर मदन सिंह राजा झाले. 89 दिवसाच्या कार्यकाळात त्यांनी सोने, चांदी आणि तांब्याची नाणी काढली. या नाण्यावर त्यांनी जय हिंद लिहिलं. मदन सिंहाचे राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले. मात्र, त्याने काढलेली नाणी इतिहासात अजरामर झाली आहे. ही दुर्मिळ नाणी चंद्रपूर येथील नाणी संग्राहक तथा अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्या संग्रही आहेत.