मतदानाच्या दिवशी मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, 'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७'चे वेळापत्रक जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर २०२४ रोजी मेट्रो सेवेची वेळ वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
निवडणूक काळात कर्तव्यावर असलेले कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचणे आणि रात्री उशिरा घरी परतणे सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर - गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या दोन्ही मार्गिकांवरील सेवा बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५.५५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुरू होईल. तसेच मेट्रो सेवा रात्री ११.३३ ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील.
मुंबई महानगरपालिकेसह अन्य सरकारी यंत्रणांमधील कर्मचारी - अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने मतदानाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी नियुक्त अधिकारी - कर्मचाऱ्यांना पहाटेलवकर मतदान केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. तसेच त्यांना निवडणुकीचे काम संपवून घरी परतण्यासाठी रात्री उशीर होणार आहे. त्यामुळे कर्मचारी - अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ करण्याची विनंती मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि एमएमआरडीएला केली होती.
असं असेल मेट्रोचे वेळापत्रक
– सकाळच्या सेवा : ०४:०० वाजता – ०५:२२ वाजता
– रात्री उशिराच्या सेवा : रात्री ११ वाजता – मध्यरात्री १ वाजता
– या वाढीव वेळेत मेट्रो दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल
– विस्तारित कामकाज:
– एकूण १९ अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण दैनिक फेऱ्या २४३ वरून २६२ फेऱ्यांपर्यंत वाढतील.
– नियमित सेवा ०५:२२ वाजता ते २३:०० वाजता दरम्यान सुरू राहतील.