मोदी सरकारचे आठ वर्ष! नोकरीसाठी आले 22 कोटी अर्ज, 7 लाख उमेदवारांनाच मिळाल्या नोकऱ्या
गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) काळात मिळालेल्या नोकऱ्यांचा डेटा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तब्बल २२.०५ कोटी लोकांनी रोजगारासाठी अर्ज केला होता. त्यातून देशभरातील ७ लाखांहून अधिक लोकांना केंद्र सरकारने (Central Government of India) नोकऱ्या दिल्या आहेत. केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.
२०२१-२२ या वर्षात ३९८५० लोकांची भरती केली जाणार
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं की, २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ७ लाख २२ हजार ३११ जणांची भरती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी २०२१-२२ मध्ये ३९८५० लोकांची भरती करण्यात आली होती, तर या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १ कोटी 86 लाखांपेक्षा जास्त होती. यापूर्वी 2020-21 मध्ये ७८५५५ आणि २०१९-२० मध्ये १, ४७, ०९६ लोकांची भरती करण्यात आली होती.
जितेंद्र सिंह यांनी असंही सांगितले की, या आठ वर्षांत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी एकूण २२ कोटी ५ लाख ९९ हजार २३८ अर्ज आले आहेत. मोदी सरकार देशात रोजगार वाढवण्यावर खूप भर देत असल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. यासाठी रोजगाराच्या संधी वाढविण्याबरोबरच तरुणांची पात्रता वाढवण्याच्या दिशेनंही काम केलं जातंय.
१ मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारमध्ये सुमारे १० लाख पदं होती रिक्त
जितेंद्र सिंह यांनी यापूर्वी गेल्या बुधवारी म्हणजेच २० जुलै २०२२ रोजी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये १ मार्च २०२२ पर्यंत ९ लाख ७९ हजार पदं रिक्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात म्हणजे जून २०२२ मध्ये सांगितलं होतं की, त्यांचं सरकार २०२४ पूर्वी विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे १० लाख लोकांना रोजगार देईल.
जितेंद्र सिंह यांनी संसदेत दुसर्या लेखी उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारमध्ये भरतीची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. ज्यासाठी संबंधित मंत्रालये आणि विभाग जबाबदार आहेत. ते म्हणाले की, सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा, कर्मचार्यांचे निधन अशा कारणांमुळे सरकारी खात्यांमध्ये पदे रिक्त राहतात.