Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन बंद; कारण काय?
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे. अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला रामलल्ला मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. गाव खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण दिवाळी साजरी करण्याची तयारी करत आहेत. आपल्या गावाहून अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघालेत. अशात अयोध्येत जाणाऱ्या भक्तांची नाराजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने अयोध्या रुटवरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द केल्यात.
अयोध्येकडे जाणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अयोध्येहून आनंद विहारकडे धावणारी नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. तसेच दून एक्स्प्रेससह 35 गाड्या दुसऱ्या मार्गांवरुन वळविण्यात आल्या आहेत. अयोध्येकडे जाणाऱ्या गाड्या 16 ते 22 जानेवारी या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. अयोध्या-आनंद विहार वंदे भारत एक्स्प्रेसचे यापूर्वी 15 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली होती. परंतु तिची तारीख 22 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळाच्या सुरक्षेच्या दृष्टिने ट्रेन रद्द करण्यात आल्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अयोध्या कँट ते आनंद विहार अशी धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 15 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली होती. परंतू आता हीच तारीख वाढवण्यात आली असून २२ जानेवारीपर्यंत गाड्या रद्द करण्यात आले आहेत. अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या रेल्वे विभागाचे दुहेरीकरण प्राधान्याने केले जात आहे. अशी माहिती उत्तर रेल्वे लखनऊ विभागाच्या वरिष्ठ विभगीय व्यावसायिक प्रशासक रेखा शर्मा यांनी दिली आहे. १६ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान कामानिमित्त या मार्गावरील ट्रेन क्रमांक 04203/04204 रद्द करण्यात आली आहे. तसेच, अयोध्या कांतरहून धावणारी आणि विविध ठिकाणी थांबणारी लखनऊ मेलची सेवा देखील रद्द राहिल.