आमचे अंदाज नीट वाचले जात नाही; हवामान विभागाचं अजित पवारांना प्रत्युत्तर
पुणे | अमोल धर्माधिकारी : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज हवामान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच याबद्दल आपण सरकारशीही चर्चा करु असं सांगितलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर पुणे हवामान विभागाचे (IMD, Pune) प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हवामान विभाग जे काही अंदाज वर्तवत असतो त्यातील अंदाज बऱ्यापैकी बरोबर असतात. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या काळात पाऊस पडलाच नाही त्यामुळे अजित पवारांनी हवामान विभागावर टीका केली.
हवामान विभागाने या विषयावर बोलताना सांगितलं की, हवामान विभागाने दिलेल्या सूचना नीट वाचल्या जात नाहीत. हवामान विभागाने फक्त घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. तो बऱ्यापैकी खरा ठरला आहे. हवामान विभागाकडे बऱ्यापैकी यंत्रसामग्री असून केंद्र सरकार पुरेपूर निधी वेळोवेळी हवामान विभागाला देत असते. पुढच्या पंचवीस वर्षांचं नियोजन हवामान विभागाकडे तयार आहे असं होसाळीकर यांनी स्पष्ट केलं.