चांदणी चौकातील पुलाचा ठेकेदार किती भारी असेल, आमची सत्ता आली तर...वसंत मोरेंचं ट्विट चर्चेत
अमोल धर्माधिकारी, पुणे
मुंबई बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकात असलेला पूल अखेर पाडण्यात आला. यासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. एक ऑक्टोबर च्या मध्यरात्री स्फोटकांच्या मदतीने आधी पूल खिळखिळा करण्यात आला आणि त्यानंतर जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने हा फुल जमीनदोस्त करण्यात आला. सुरुवातीला स्फोटक झाल्यानंतरही हा पूल पडला नसल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा झाली होती. ठेकेदारांना किती मजबूत काम केलं होतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांमधून येत होत्या. त्यानंतर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील या संदर्भात एक ट्विट केला आहे. त्यांचं हे ट्विट आता चांगलं चर्चेत आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
६०० किलो स्फोटक, १३५० होल, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत. यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल! भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन.. वसंत मोरे यांनी केलेल्या ट्विटची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगलीय.