उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल; तपास एनआयएकडे

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल; तपास एनआयएकडे

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ट्विटरद्वारे माहिती
Published on

सूरज दहाट | अमरावती : बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे याचाही तपास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरद्वारे दिली आहे.

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला रात्री हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. तर, मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती. या प्रकरणाची गृह मंत्रालयानेही गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक व एटीएस अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधित स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहे. तर, पोलिसांनी कोल्हे हत्येप्रकरणी सहाव्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com