ऐतिहासिक सोहळा! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज अयोध्येत रामराज्य परतणार आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज, गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर आज प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची पूजा करण्यात येणार आहे. गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. अवधपुरीत उत्सवाचं वातावरण आहे. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणार आहे त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झाला आहे. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त काढण्यात आला आहे.
दरम्यान, 23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.