Sippy Sidhu murder case
Sippy Sidhu murder caseTeam Lokshahi

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजाच्या हत्येत हिमाचल हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या मुलीला अटक

20 सप्टेंबर 2015 रोजी सिप्पीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जानेवारी 2016 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं.
Published on

चंदीगड : राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज सुखमनप्रीत सिंगच्या हत्येप्रकरणी (Sippy Sidhu murder case) सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. कल्याणी सिंह नावाच्या आरोपीला अटक करण्यात आल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कल्याणी सिंहची आई हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. तर मृत मुलाचे वडील पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात सहायक सॉलिसिटर जनरल होते, तसंच आजोबा पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. प्रेमातील कलहामुळेच मुलाची हत्या झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट नेमबाज आणि वकील सुखमनप्रीत सिंग सिद्धू उर्फ ​​सिप्पी सिद्धू यांची चंदीगडच्या सेक्टर 27 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेच्या जवळपास सात वर्षांनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सबिना यांची मुलगी कल्याणी सिंग यांना अटक केली. न्यायमूर्ती सबिना या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती देखील आहेत.

20 सप्टेंबर 2015 रोजी सिप्पीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येत 12 बोअरचे पिस्तूल वापरण्यात आलं असून, त्यातून चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चंदीगड पोलिसांनी सेक्टर 26 पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. जानेवारी 2016 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं, त्यानंतर तपास सीबीआयने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सप्टेंबर 2016 मध्ये सीबीआयच्या अधिकार्‍यांनी खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यांना 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

सीबीआयने एका वृत्तपत्रात एक जाहिरातही दिली होती. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, "हत्येच्या वेळी सिप्पीच्या मारेकऱ्यासोबत एक महिला होती. ती गुन्ह्यात सहभागी होती अशी शक्यता आहे." डिसेंबर २०२१ मध्ये सीबीआयने बक्षीसाची रक्कम १० लाख रुपये केली. मात्र, या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. 2020 मध्ये, सीबीआयने न्यायालयात एक अहवाल देखील दाखल केला होता. या अहवालात सरकारने नमूद केलं होतं की, सिप्पी सिद्धू हत्येतील एका महिलेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्यामुळे तपास सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com