"रेड कॅटेगरीत येणाऱ्या अतिधोकादायक कंपन्या बंद करणार"; डोंबिवलीतील स्फोटाच्या घटनेनंतर CM शिंदेंचं मोठं विधान
CM Eknath Shinde On Dombivali MIDC Blast : हा स्फोट मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या पाच-सहा कंपन्या आणि नागरी वसाहतीच्या काचांना तडे गेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये काही लोक अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु आहे. स्फोटाची तीव्रता खूप मोठी असल्याने जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ६० लोक जखमी झाले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. ही घटना दुर्देवी आहे. यापूर्वीही असाच स्फोट झाला होता. तेव्हाही काही जीवितहानी झाली होती. रेड कॅटेगरीत येणाऱ्या धोकादायक कंपन्या बंद करणार, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी पाहणी केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं.
शिंदे पुढे म्हणाले, शहराच्या बाहेरील एमआयडीसीत त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा दिली जाईल. या युनिटच्या संदर्भात अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या. अमुदान कंपनीबाबत जी काळजी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. या चौकशीत जे कुणी दोषी आढळून येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या दुर्घटनेबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत केली जाईल. तसच जखमींचा खर्च शासन करणार आहे.
डोंबिवली एमआयडीसीत झाला मोठा स्फोट
डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाल्याचं समजते आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्फोटामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० कामगार जखमी झाले आहेत.