प्रत्येक तिसऱ्या मुंबईकराला आहे उच्च रक्तदाब; 'ही' चूक ठरतेय घातक
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दैनंदिन आहारात मिठाचं प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा जास्त नसावं असं म्हटलं आहे. मात्र बीएमसीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, सरासरी मुंबईकर (Mumbai) दररोज 8.9 ग्रॅम मीठ वापरतात. त्यामुळे 18-69 वयोगटातील प्रत्येक तिसऱ्या मुंबईकराला, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे असं अभ्यासात आढळून आलं आहे. मुंबई महानगरपालिकेल्या (BMC) आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ संजीव कुमार म्हणाले, की "आम्ही 5,000 हून अधिक मुंबईकरांचे वैज्ञानिक पद्धतीचं सर्वेक्षण केलं असून, प्राथमिक दृष्ट्या असं दिसून येतंय की, 34% मुंबईकरांना उच्च रक्तदाब आहे. जास्त मीठ खाण्याचेच हे परिणाम असू शकतात." 2021 मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 18-69 वयोगटातील लोकांचा आहार, जीवनशैली आणि रक्ताच्या नमुण्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
डॉ कुमार या बद्दल माहिती देताना म्हणाले, अलीकडच्या काळात उच्च रक्तदाब हा सर्वात मोठा आजार म्हणून उदयास आला आहे. BMC या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्य योजना तयार करण्याच्या तयारीत आहे. बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितलं की, मुंबईत उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्त आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असून देखील उपचार न घेतल्यानं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
बीएमसीच्या आरोग्य पथकाने झोपडपट्ट्यांसारख्या भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं उच्च रक्तदाब तपासणीसाठी घरोघरी जाऊन सामुदायिक आरोग्य तपासणीसह तीन-स्तरीय योजना जाहीर केली. "आम्ही आमच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रत्येक नोंदणीकृत रुग्ण आणि त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांचा रक्तदाब तपासण्यासाठी एनसीडी कॉर्नर देखील ठेवू." असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तिसरं म्हणजे, BMC पुढील 45 दिवसांत मोफत तपासणी आणि उपचारांसाठी झोपडपट्ट्यांमध्ये क्लिनिक आणि पॉलीक्लिनिक्स म्हणून 'पोर्टा केबिन' सुरु करणार आहे. पुढील 8-9 महिन्यांत शहरातील 30 वर्षांवरील लोकांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं डॉ कुमार म्हणाले.
ज्या लोकांची स्थिती जास्त नाजूक असेल त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. "आम्ही उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. नोव्हेंबर 2021 ते जून 2022 दरम्यान, आम्ही आहारतज्ज्ञांच्या मदतीनं 12,000 हून अधिक रुग्णांना समुपदेशन केलं," असं उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.