नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेटसक्ती; चेकिंग पॉईंट कोणते आहेत?
आजपासून पुन्हा नाशिक शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. यासाठी चेकिंग पॉईंट उभारण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईला सामोरे जायचे नसल्यास चांगल्या प्रतीचे हेल्मेट दुचाकी धारकांना वापरणे बंधनकारक आहे.
स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे. आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.