कीवमध्ये हेलिकॉप्टर अपघात; युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह 18 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : रशियासोबतच्या युद्धादरम्यान युक्रेनची राजधानी कीवमध्ये आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजधानी कीवपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रोव्हरी भागात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यामध्ये सध्या 2 लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांच्यासह गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 42 वर्षीय डेनिस मोनास्टिरस्की यांची 2021 मध्ये युक्रेनचे अंतर्गत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. हेलिकॉप्टर अपघात रशियाच्या हल्ल्यामुळे झाला की तांत्रिक बाबींमुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.