School Bags: दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांची पाठदुखी बनतेय पालकांची डोकेदुखी
शाळकरी मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हे पालकांची डोकेदुखी ठरली आहे.
प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखीचा त्रास, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मणक्याची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण, डोकेदुखी यासारखे आजार होऊ शकतात. पाठीवरचे दप्तर योग्यरीत्या न घातल्यास तसेच दप्तरातील वह्या-पुस्तके तसेच इतर वस्तूंच्या ओझ्यामुळे 6 ते 16 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये पाठदुखीची समस्या आढळून येत आहे.
भविष्यात मान, पाठीचा कणा इत्यादी व्याधी विद्यार्थ्यांमध्ये बळावू शकतात. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धतच बदलली आहे. किंबहुना या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ठेवण बदलत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.