वर्ध्यात मुसळधार पाऊस; आष्टीतील 20 कुटुंब स्थलांतर तर समुद्रपूरात 7 जण अडकले
भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे (monsoon update) जनजीवन विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरु आल्याने अनेक नदी नाल्यानं पूर आले आहे. यात आष्टी शहरातील हुतात्मा स्मारक समिती परिसरात नदीचे पूर घुसल्याने 20 कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले, तर समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्यभागात 7 नागरिक अडकले. स्थानिक प्रशासनाच्या पथकाने सर्वांना सुखरूप काढण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील साहूर, धाडी, लहान आर्वी, नवीन आष्टी,पेठ अहमदापुर येथे गावात पुराचे पाणी शिरले आहे घरातील साहित्य भिजल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे.
संततधार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यानं मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे सर्वच भागातील रस्त्यावरील पुलावरून पूर वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. आर्वी - तळेगांव वर्धमनेरी जवळील पुलावरून पूर वाहत आहे. आर्वी खडकी शिरपूर, तळेगांव - जळगांव, कारंजा माणिकवाडा खडक नदीवरील पूल, हिंगणघाट - पिंपळगाव भाकरा नाला ,समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाल्याच्या पुलावरून पूर वाहत आहे. यासह अनेक रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 6 तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. अजूनही पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे रात्रीचे मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्याचे पूर शेतात शिरल्याने शेतपिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
शेतपिकांचे मोठं नुकसान, शेतकरी संकटात
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्याना आलेलं पूर शेतात शिरल्यामुळे शेतातील पिके पाण्याखाली आल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यात अनेक शेतात पाणी गेले तर आज झालेल्या पावसाचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यात 70 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.
मुख्य रस्त्यासह ग्रामीण रस्ते बंद जवळपास 20 गावाचा संपर्क तुटला
कारंजा आष्टी आर्वी तालुक्यातील मुख्य रस्त्यासह ग्रामीण रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सर्वच रस्ते बंद आहे. कारंजा - माणिकवाडा रस्त्यावरील खडक नदीला पूर आल्याने सावरडोह ,खापरी, बेलगाव, सुसुंद्रा, माणिकवाडा, तारासावंगा या गावाचा संपर्क तुटला तर कारंजा - उमरी, कारंजा -गवंडी -सावल -धावसा , ढगा, ब्राम्हणवाडा, नारा- आजनादेवी , आर्वी तळेगांव यासह इतर गावाचा संपर्क तुटला आहे. खडक नदीवरील पुलावरचे पाणी रात्रभर ओसारणार नसल्यान हा मार्ग जवळपास 24 तास बंद राहणार आहे. समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाल्याला पूर आल्याने येथील रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आष्टी शहरासह 10 गावाचा विद्युतपुरवठा बंद
आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पूर आला आयात अनेक गावांत पाणी शिरले यामुळे आष्टी शहरासह 10 गावांचा विद्युतपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी विद्युतपुरवठा बंद केल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. पूरपरिस्थिती सुरळीत झाल्यास तात्काळ विद्युतपुरवठा सुरळीत करून चालू करण्यात येणार आहे.