हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान; अनेक ठिकाणी भूस्खलन, मृतांचा आकडा २१ वर
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने अगदी थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे नद्यांमध्ये रुपांतर झाले आहे. पुरस्थिती निर्माण झाली आहे. 24 तासांपासून तिथे मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण बेपत्ता असून बचाव पथकाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सध्याची पुरस्थिती लक्षात घेऊन येथील राज्य प्रशासनाने शनिवारी तातडीची बैठक घेऊन २३२ कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. सध्याच्या पुरस्थितीमुळे येथील एकूण ७४२ रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती मुख्यमंत्री जयमराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासन, बचाव व पुनर्वसन विभागाला जलद गतीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.