Wardha Rain : वर्ध्यात मुसळधार पावसाची बॅटिंग; निम्न धरणाचे 31 दरवाजे उघडले
भूपेश बारंगे, वर्धा
वर्धा जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केली .अद्यापही पावसाने विश्रांती घेतली नसून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे अनेक मार्ग रात्रीपासून बंद झाले तर अनेक भागातील घरात पुराचे पाणी शिरले. हिंगणघाटमधील महाकाली नगरात भाकरा नाल्याचे 20 घरात पाणी घुसल्याने अनेक कुटुंबाना इतरत्र हलविण्यात आले आहे. तर 50 ते 60 नागरिक या भागात अडकले आहे.
नाल्याच्या पूरात वाढ होत असल्याने प्रशासनाचे मदतकार्य सध्या थांबले आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावात पाणी शिरले आहे. कुटकी मार्ग ,दाभा मार्ग, पिंपळगाव मार्ग बंद झाला आहे. तर सोनेगाव, कान्होली ,आलमडोह गावात पाणी शिरले.सेलू तालुक्यात चाणकी- कोपरा गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हमदापुर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे काही घरांमध्ये पाणी घुसले. बाभूळगाव पुलावरून पाणी सुरू असल्याने रहदारी मार्ग बंद झाला आहे. येथील काही घरे पाण्याखाली आले आहे. सिंदी ते दिग्रज येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दिग्रज गावाचा वाहतूक संपर्क तुटलेला आहे. तसेच सिंदी ते पळसगाव बाई येथील वाहतूक संपर्क बंद झाला. तसेच दहेगाव ते पहेलानपुर वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
बोरखेडी कला लगत असलेल्या नाल्याला पूरआला असुन रोड वरून अंदाजे 3 ते 4 फूट पाणी आहे. पिंपळगाव येथे बोर नदीला पूर गावापर्यंत पाणी शिरले. तुर्त कोणताही धोका नाही. परंतु सर्वत्र पाऊस होत असल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत आहे. चिंचोली लगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
निम्न वर्धाचे सर्व 31 दरवाजे उघडले
धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे आज १८ जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजता १०० सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी/से.पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.