Pune Monsoon Update
Pune Monsoon Update

पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पावसाचा आढावा घेतला असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत
Published by :
Naresh Shende
Published on

Ajit Pawar On Pune Monsoon Update : पुण्यात मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळाधार पाऊस पडल्याने पुणे शहर आणि परिसरातील सखल भागात पाणी साचलं. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वाहतुकीचा खोळंबाही उडाला आहे. तसच पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाचा आढावा घेतला असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पवारांनी याबाबत ट्वीटरवर महिती दिली आहे.

अजित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?

पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या अनुषंगानं राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com