आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केली पोलखोल
आरोग्य मंत्र्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी पोलखोल केली आहे. भारती पवार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात गेल्या असता, शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यांना खासगी रुग्णालयातून औषधं खरेदी करण्यास सांगितली. जिल्हा रुग्णालयाकडून खासगी मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला भारती पवार यांना देण्यात आला. त्यानंतर मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे.
भारती पवार म्हणाल्या की, मी स्वत:पेशंट म्हणून काही ठिकाणी अचानक भेटी देत आहे. तेथील परिस्थिती समजून घेत असल्याचे मंत्री भारती पवार म्हणाल्या. ग्राऊंड लेवलवर नेमकं काम कसं चाललं आहे पाहणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळं ठिकाठिकाणी भेटी देऊन माहिती घेत असल्याचे भारती पवार म्हणाल्या.
जेव्हा मी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा लक्षात आले की, तिथे काही औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळं तत्काळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत तत्काळ औषधांची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांना बाहेरुन औषधे विकत न आणण्याची वेळ येऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या आमचा आग्रह आहे की, सगळी औषधे रुग्णालयात मिळाली पाहिजेत. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या.