ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला असून, ही सुनावणी आता ट्रायल कोर्टात सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केलं आहे. हिंदू पक्षाची याचिका कायम ठेवण्यायोग्य आहे की नाही हे ट्रायल कोर्ट ठरवेल. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, 'वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश या प्रकरणाची सुनावणी करतील. 17 मे रोजी दिलेला अंतरिम आदेश 8 आठवडे लागू राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वजूची व्यवस्था केली आहे.
आमचा 17 मेचा आदेश वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या 16 मेच्या आदेशावर लागू होईल. 17 मेचा अंतरिम आदेश जिल्हा न्यायाधीशांच्या निकालापर्यंत लागू राहील, त्यानंतर पक्षकारांना कायदेशीर उपायांसाठी 8 आठवडे वेळ असेल. विशेष म्हणजे 17 मे रोजी सुप्रीम कोर्टाने 'शिवलिंग' जतन करण्यास आणि पूजा करण्यास परवानगी दिली होती. आता 'सर्वोच्च न्यायालयात' उन्हाळी सुट्टीनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, हा खटला 1991 च्या कायद्याचे उल्लंघन आहे की नाही या मुस्लिम पक्षाच्या अर्जावर जिल्हा न्यायाधीश निर्णय देतील. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली.