हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकींच्या तारखा होणार जाहीर?
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्व राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे.निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI च्या उच्चस्तरीय पथकाने नुकताच हिमाचल प्रदेश आणि गुजरातचा दौरा केला.उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेशकडे लागले आहे. कारण या वर्षाच्या अखेरीस दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजप सत्ता टिकवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही, नवीन प्रवेश करणारा आप देखील सत्ताधारी कारभाराला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.