Deepak Kesarkar: गोविंदा पथकांना सुरक्षा पुरवण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आदेश
गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला. गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी व सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
मात्र मुंबईत विविध ठिकाणी जी गोविंदा पथके सराव करीत असतात त्यांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी गोपाळकालाच्या दिवशी देखील ही सेवा पुरवावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
दहीहंडीत 18 वर्षापेक्षा कमी वयाचे गोविंदा नसावेत, तसेच 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचे मानवी मनोरे रचू नयेत, असे आदेश मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. हे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले आहेत. या आदेशांवर फेरविचार करण्याची याचिका जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. वरच्या दोन तीन थरांवर असलेल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना कराव्यात. दुर्घटना घडून कोणती जिवितहानी होऊ नये याकरीता सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा असेही आदेश त्यांनी दिले आहेत.