मोबाईल इंटरनेटवर सरकारचा मोठा निर्णय! साडेतीन तास इंटरनेट बंद, कायदा काय म्हणतो?
आसाम सरकारने ग्रेड थ्री पदांच्या भरतीसाठी 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी लेखी परीक्षेदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून ते 1:30 वाजेर्यंत साडेतीन तासांसाठी संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, स्थिर टेलिफोन लाईनवर आधारित व्हॉईस कॉल आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी चालू राहतील.
गृह आणि राजकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अजय तिवारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, परीक्षा मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वास्तविक, सरकारी नोकऱ्यांसाठीच्या भरती परीक्षेत होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार हे करत आहे.
इंटरनेट बंद करण्यासाठी भारतात कायदेशीर चौकट भारतीय टेलिग्राफ कायदा, 1885 अंतर्गत तयार करण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 5(2) नुसार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे राष्ट्रीय सुरक्षा, राज्य सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा कोणत्याही गुन्हेगारी क्रियाकलापांना प्रतिबंध करण्यासाठी इंटरनेट सेवा निलंबित करू शकतात.