Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक टि्वट
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातून विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे देखील दरवर्षी न चुकता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला व स्मृती दिनाला त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर जात असतात. यावर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी एक भावनिक टि्वट केलं आहे.
या टि्वटमध्ये धनंजय मुंढे म्हणतात, हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून!विनम्र अभिवादन अप्पा... असेही मुंडे टि्वटमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे सांगितलेआहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. पण प्रत्येकजण गोपीनाथ गडावर पोहचू शकत नाही. गोपीनाथ गड प्रत्यक्ष गावागावात घेऊन जा, परिसरात घेऊन जा. वॉर्ड, ग्रामपंचायत, गल्ली बोळात जयंतीचा कार्यक्रम साजरा करा. सोशल मिडियाच्या माध्यामातून आपण जोडले जाऊ आणि मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम घराघरात पोहचवू.