Gold Selling: धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या खरेदीत घट
सोने-चांदीच्या विक्रमी दरामुळे खरेदीत निरुत्साह
धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या खरेदीत घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीत तब्बल 10 टक्क्यांची घट
वर्षभरात सोन्याच्या दरात 33 टक्के वाढ
वर्षभरातील भरमसाठ दरवाढीमुळे यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीमध्ये ग्राहकांचा निरुत्साह दिसून आला. गतवर्षीच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीमध्ये सुमारे 10 टक्के घट झाल्याची माहिती सराफ बाजारातील तज्ज्ञांनी दिली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी हा सोने-चांदी तसेच अन्य मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. मात्र, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 33 टक्के वाढ झाल्यामुळे यंदा हा मुहूर्त साधण्याबाबत ग्राहकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र होते.
गेल्यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी, 11 नोव्हेंबर रोजी एक तोळा सोन्याचा दर 61 हजार 200 रुपये होता. यंदा हाच दर 81 हजार 400च्या घरात गेला आहे. या काळात चांदीच्या दरातही 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. दर चढे असतानाही ग्राहक खरेदीसाठी सराफ बाजारात येत असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांची घट होण्याची शक्यता असल्याचे जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊंसिलचे अध्यक्ष सियाराम मेहता यांनी सांगितले. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनीही याला दुजोरा दिला. यंदा 2, 3, 4, 5 आणि 8 ग्रॅमची नाणी तसेच चेन, डूल अशा हलक्या दागिन्यांना जास्त मागणी असल्याचे मेहता म्हणाले. बुधवारी सकाळच्या वेळातही धनत्रयोदशीचा मुहूर्त असल्यामुळे या काळातही काही विक्री होण्याची अपेक्षा असल्याचे कल्याण ज्वेलर्सचे रमेश कल्याणरामन यांनी सांगितले.