लायकी नसताना पक्षाने अनेकदा संधी दिली; महाजन यांची खडसेंवर जहरी टीका
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा मोठा संघर्ष सुरु आहे. महाविकास आघाडीमधील (MVA) अनेक नेत्यांवर भाजपने (BJP) गंभीर आरोप केले आहेत. अशातच एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि गिरीष महाजन यांच्यातील संघर्ष देखील कायम सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच आता पुन्हा एकदा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंचा समाचार घेतला आहे.
एकनाथ खडसे हे सारखं मी मोठं केलं, मी मोठं केलं असं म्हणत असतात. मात्र तुम्ही पक्षाला मोठं केलं की, तुम्हाला पक्षाने मोठं केलं असा सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे. खडसे स्वतःची पाठ थोपटून घेताहेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असंही पुढे गिरीश महाजन म्हणाले.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्यांना मी जेवढा ओळखतो तेवढा कोणी ओळखत नाही. 25 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसावर परत काय बोलणार? अजून त्यांचं मानसिक संतुलन बिघडवायचं नाही, मला त्यांची काळजी आहे असं म्हणत लायकी नसताना पक्षाने तुम्हाला अनेकदा संधी दिली अशी जहरी टीका महाजन यांनी खडसेंवर केली.