चंद्रकांत पाटलांची हिमालयात जाण्याची वल्गना आली अंगलट
अमोल धर्माधिकारी|पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आता 'हिमालया' ची एन्ट्री झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पदाधिकाऱ्यांकडून अनोख गिफ्ट देण्यात आलेला आहे. 'निवडणुकीत हरलो तर हिमालयात जाईल' या वक्तव्याची आठवण करून देत त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जमा करण्यात आलेला निधी हा कुरियरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पाठवण्यात आलेला आहे.
राज्यात महिला असो किंवा समाज यांच्याविषयी नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याची गरज आहे, आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याची व्यवस्था महाविकासआघाडी कडून करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी दिलेली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने प्रचंड ताकद लावली होती. भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील तिथे प्रचारासाठी आले. त्यांनी भाजपच जिंकणार अशी भविष्यवाणी केली. तसेच या जागेवर भाजपच्या सत्यजीत कदम यांचा विजय झाला नाही, तर आपण हिमालयात जाऊ, असं विधान केलं. आता त्यांचं हेच विधान त्यांना भारी पडलं. कारण सत्यजीत कदम यांचा 19 हजारांपेक्षाही जास्त मतांनी पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 'हिमालया'च्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.