घरडा केमिकल कंपनीची लाखोंची फसणूक करून पोबारा करणाऱ्याला पोलिसांनी इंदोरमध्ये ठोकल्या बेड्या
लक्ष्मीकांत घोणसेपाटील| रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर खेड लोटे येथील प्रसिद्ध घरडा केमिकल कंपनीकडून ऍग्रो केमिकल उत्पादने घेऊन त्याचे तब्बल ९२ लाख रुपये थकवून चक्क परप्रांतात पोबारा करणारा अशोक जैस्वाल रा.खांडवा मध्यप्रदेश याला खेड पोलिसांनी इंदोर रेल्वे स्टेशवर सापळा रचून बेड्या ठोकल्या.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबत घरडा कंपनीने फिर्याद दाखल केली होती. खेड पोलीस पथकाने इंदोरमध्ये जाऊन ही धाडसी कारवाई केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. लोटे येथील घरडा केमिकल कंपनी ही ऍग्रो केमिकलचे उत्पादन करते.देशभरात मागणी नुसार ही उत्पादने पुरवली जातात. त्यासाठी काही डिस्टयुब्युटर देखील काम करतात.त्यापैकीच अशोक जैस्वाल हा एक डिस्टयुब्युटर असून अशोक ट्रेडर्स जानकी कॉम्प्लेक्स जिल्हा खांडवा (मध्यप्रदेश)या फर्मच्या नावे ही घरडा केमिकलची ऍग्रो उत्पादने पुरण्याचे काम करत होता.अनेक वर्षे तो हे काम करत असल्याने कंपनी व्यवस्थापनाचा देखील त्याच्यावर विश्वास होता.कधी रोखीने तर कधी क्रेडिटवर तो व्यवहार करत होता.परंतु २०१८ पासून त्याने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली होती.
जुना डिस्ट्युब्युटर असल्याने कंपनी व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला.परंतु तो सातत्याने उत्पादनाची रक्कम थकवण्याचे व वेगवेगळी कारणे पुढे करण्याचे काम करू लागला.आशा पद्धतीने अशोक जैस्वाल याने घरडा केमिकल कंपनीचे तब्बल ९२ लाख रुपये थकवले.कंपनीच्या क्रेडिट विभागाने त्याच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला असता त्याने चालढकल करत थेट आपले मोबाईल नंबर बंद केले.त्यामुळे कंपनीला त्याचा संशय आला तेव्हा कंपनीने अशोक जैस्वाल तथा अशोक ट्रेडर्स यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई साठी पोलीस ठाणे तसेच खेड जिल्हा न्यायालयात दाद मागितली.
एप्रिल २०२२ मध्ये रीतसर फिर्याद दाखल झाल्यानंतर कलम ४०३,४०६,४५५,४१८,४२०,४२५ आणि १२०(B)कलमाखाली गुन्हा दाखल करून खेड पोलिसांनी अशोक जैस्वाल याचा शोध घेण्यास सुरुवात केली.त्यासाठी खेड पोलीस मध्येप्रदेश मध्ये त्याच्या मागावर जाऊन आले.परंतु तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.परंतु पोलिसांनी जिद्द सोडली नव्हती.अखेर खेड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर अधिकारी हर्षद हिंगे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल विशाल धाडवे,सुनील पाडळकर असे पोलिसांचे पथक काही दिवसांपूर्वी पुन्हा मध्यप्रदेश मध्ये दाखल झाले.
अशोक जैस्वाल याचा शोध सुरू असतानाच त्यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली.आणि पोलिसांना पहिला धागा सापडला.अशोक जैस्वाल याचा मुलगा इंदोर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्याच्याकडे संपर्क साधला मात्र त्याने देखील पोलिसांची दिशाभूल करणारे उत्तरे दिली. परंतु पोलीस इंदोर येथेच ठाण मांडून राहिले आणि अशोक जैस्वालच्या मुलाच्या हालचालीवर लक्ष ठेवत त्यांनी त्याचा मोबाईल नंबरचा डेटा माहिती देखील मिळवली.तेव्हा मात्र पोलिसांना यश आले.
अशोक जैस्वाल हा इंदोर रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मोबाईल डेटाच्या माध्यमातून मिळताच त्यांनी इंदोर रेल्वे स्टेशनवर सापळा रचला व सावज टप्प्यात येण्याची प्रतीक्षा करू लागले.शुक्रवारी रात्री अशोक जैस्वाल रेल्वे स्टेशवर येताच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि त्याच ठिकाणी बेड्या ठोकल्या.आज त्याला खेडमध्ये आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे.