मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढा! काँग्रेसची मागणी
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथील पुलाचं काम सुरू असतानाच तो कोसळल्यानंतर आता संताप व्यक्त होत आहे. या पुलाच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाबद्दल सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुंबई प्रदेश कॅांग्रेसने केली आहे. या महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून हे सर्व पैसे चिपळुणच्या पुलाप्रमाणेच धुळीला मिळाले, अशी भावना मुंबई प्रदेश कॅांग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेबद्दल गेले अनेक महिने ओरड सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग सुस्थितीत आणण्याची घोषणा केली होती. या महामार्गाचं चौपदरीकरण होणार होतं. मात्र हे काम प्रचंड कूर्मगतीने सुरू आहे. गेली अनेक वर्षे काम सुरू असूनही अद्यापही हा मार्ग दुरवस्थेतच आहे.
गणेशोत्सवाआधी हा मार्ग सुस्थितीत आणण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र ही घोषणाही भाजपच्या अनेक फसव्या घोषणांसारखीच ठरली आहे. त्यातच सोमवारी चिपळूण येथे बहादूर शेख नाका भागात निर्माणाधीन असलेला उड्डाणपूल कोसळण्याची घटना घडली. निकृष्ट काम केल्यामुळेच ही घटना घडली आहे, अशी टीका मुंबई प्रदेश कॅांग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
गेली अनेक वर्षे कोट्यवधी रुपये खर्चूनही हा महामार्ग पूर्ण होत नसेल आणि झालेलं बांधकामही अशा तकलादू दर्जाचं असेल, तर या कामात नक्कीच भ्रष्टाचाराचं पाणी मुरतंय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुंबई कॅांग्रेसने केली आहे.
या सरकारने केलेल्या सर्वच घोषणा या महामार्गाच्या कामासारख्या पोकळ आणि तकलादू आहेत. सरकारला कर नसेल, तर ते श्वेतपत्रिका काढायला डरणार नाहीत, अशी टीकाही प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.