ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर गौतम अदानींची मोठी घोषणा; अनाथ मुलांना शिकवणार
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात काहींनी वडील तर काहींनी आई गमावली. कुणी कुटुंबासोबत जात होते, कुणी कुटुंबासाठी कमवत होते. रेल्वेच्या भीषण अपघातमुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या प्रियजनांच्या शोधात लोक दारोदार भटकत आहेत. याच दरम्यान देशातील उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत गौतम अदानी यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ओडिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे आपण सर्वजण अतिशय दुःखी आहोत. या दुर्घटनेत ज्या मुलांनी आई-वडील गमावले आहेत. त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचा निर्णय गौतम अदानी यांनी जाहिर केला आहे. तसेच, पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ओडिशातील रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला, तर 1175 जण जखमी झाले. रुग्णालयांच्या शवागारांमध्ये मृतकांना ठेवण्यास जागा शिल्लक नाही. मृतदेहांची संख्या पाहता शाळा आणि कोल्ड स्टोरेजचे रूपांतर शवागारात करण्यात आले आहे. अपघातानंतर नातेवाईक आपल्या प्रियजनांच्या शोध घेण्यासाठी रुग्णालये आणि शवागारात जात आहेत.