सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे हस्तीदंताची विक्री करणारी टोळी गजाआड
संजय देसाई।सांगली: जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये रकमेचे दडवून ठेवलेले हस्तिदंत कवठेमहंकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राहूल भिमराव रायकर (वय 28 रा.संकपाळ गल्ली,कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय 30, विजयनगर, कोल्हापूर), कासिम शमशुद्दीन काझी (वय 20,रा.खाजा वस्ती,मिरज) व हणमंत लक्ष्मण वाघमोडे ( वय 39, रा.लोणारवाडी ता. कवठे महांकाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना हस्तिदंताची खरेदी विक्री बाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी खरशिंग गावानजिक दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकून आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात यश मिळाले.पोलीसांनी या चार आरोपीकडून 20 लाख रुपयांचे दोन हस्तिदंत, 40 हजार रूपयांच्या दोन मोटरसायकली असा एकूण 20 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.