CNG Price Hike: ऐन गणेशोत्सवात सीएनजीच्या दरात 'एवढ्या' रुपयांची वाढ
सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. रविवारी (9 सप्टेंबर 2024) मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीच्या किरकोळ किमतीत वाढ होणार आहे. पुणेकरांच्या खिशाला आता इंधन दर वाढीच्या झळा बसणार आहेत. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किंमतीत 90 पैशांनी वाढ करण्यात झाली आहे.
नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी 85.90 रुपये किलोने मिळणार आहे. दरम्यान, 2 महिन्यांपूर्वीच सीएनजी दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणत फटका सहन करावा लागत असल्याने अनेक नागरिक आता सीएनजी वाहनांकडे वळले आहेत.
सीएनजीच्या दरात वाढ झालेली असली तरी सीएनजीचे दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्यामुळे सीएनजी हा स्वस्त इंधनाचा पर्याय वाहनचालकांसमोर आहे. नव्या किमतीनुसार सीएनजीचा दर 85.90 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. म्हणजेच पेट्रोलच्या तुलनेत अंदाजे 49 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत अंदाजे 27 टक्क्यांनी पैशांची बचत होते. ऑटो रिक्षा चालकांसाठी ही बचत सुमारे 29 टक्के होते. सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजीच्या किमती स्थिर आहेत. सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीचा पीएनजीच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाहीये.