आज गगनयान मिशनअंतर्गत पहिली चाचणी पार पडणार आहे. ही चाचणी आज सकाळी आठ वाजता श्रीहरीकोटा येथे होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे.
ही यंत्रणा श्रीहरिकोटाच्या किनार्यापासून 10 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात उतरेल. भारतीय नौदलाचं जहाज आणि डायव्हिंग टीमच्या मदतीनं ते बाहेर काढलं जाणार आहे. क्रू मॉड्युल रॉकेट टेक ऑफ झाल्यानंतर 531.8 सेकंदात लॉन्च पॅडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर उतरेल.
भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. हे मॉड्यूल अंतराळात घेऊन गेल्यानंतर ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे.