Alt News चे संपादक मोहम्मद जुबेर यांच्याविरुद्ध लखीमपूर कोर्टाचं अटक वॉरंट
लखीमपूर खेरी : अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्याविरुद्ध सुदर्शन न्यूजच्या एका कर्मचाऱ्याने फॅक्ट चेक ट्विटसावरुन तक्रार दाखल केली होती, त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वॉरंटनुसार त्यांना 11 जुलै रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तर मोहम्मद जुबेर सध्या सीतापूर कारागृहात आहे.
सीतापूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात जुबेरला पाच दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मोहम्मदी पोलिस स्टेशनमध्ये 2021 मध्ये दोन गटांमधील वादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली लखीमपूर खेरी पोलिसांनी हा एफआयआर नोंदवला होता. लखीमपूर खेरी कोर्टातून जारी करण्यात आलेलं हे वॉरंट सीतापूर कारागृहात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, लखीमपूर खेरीचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितलं की, न्यायालयाच्या वतीने वॉरंट जारी केल्यानंतर मोहम्मदी पोलीस तिथे पोहोचले आणि जुबेर सीतापूर कारागृहात असल्यानं तिथे वॉरंट पोहोच केलं. आता जुबेर यांना न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी तुरुंग प्रशासनाची असणार आहे.