शिवसेनेच्या माजी आमदारावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
पुणे : हडपसर विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadeo Babar) तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. माजी आमदाराने शिवीगाळ केल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेल्या फिर्यादीला लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत.
काही राजकीय पक्षांनी १० ऑक्टोबर २०२१ रोजी भारत बंद पुकारल होता, त्याचे पडसाद पुण्यामध्येही उमटले होते. यातच पुण्यातील कोंढवा भागामध्ये महादेव बाबर, नारायण लोणकर, काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे बाळासाहेब भगवान मस्के यांच्या बहिणीच्या दुकानांमध्ये घुसून बंद करण्याचा प्रयत्न करत होते. फिर्यादी मासे विक्रीचे दुकान बंद कर म्हणत शिवागाळ करणाऱ्या आमदाराविरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गेले. परंतु, राजकीय पुढाऱ्यांनीच पोलीस स्टेशनला येऊन बाळासाहेब मस्के यांना जातीवाचक शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर होत असताना देखील त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
शिवीगाळ करणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना थांबविण्याऐवजी बाळासाहेब मस्के यांच्यासाठी न्यायिक अशी कोणतीही भूमिका न घेता उलट पोलिसांनी फिर्यादीलाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, फिर्यादींचा आवाज दाबण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबर २०२१ रोजी ३५३ कलमांतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात फिर्यादी बाळासाहेब भगवान म्हस्के यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयाकडे धाव घेतली होती.
अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये नारायण लोणकर, महादेव बाबर, अब्दुल बागवान, असलम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमणी, सईद शेख, राजू सय्यद या राजकीय पुढारी विरोधात तर पोलीस स्टेशन निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्या विरोधात भादंवि कलम 298, 323, 341, 352, 355, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे