ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राईम ब्रांचकडून अटक
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. योगेश भोईर यांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भोईर यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाई विरोधात रात्री शिवसैनिकांनी क्राईम ब्रँच युनिट बाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा विरोध केला.
योगेश भोईर हे ठाकरे गटाचे कांदिवलीतील (Kandivali) उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवकही आहेत. विकासकांकडून दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला होता. परंतु एका जुन्या गुन्ह्यातलं प्रकरण क्राईम ब्रांच युनिट अकराकडे दाखल झालं. या प्रकरणात त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. रात्री योगेश भोईर यांना अटक करण्यात आली. आज (बुधवारी) त्यांना 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.