या कारणासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, “मी मंत्री असताना आम्ही या महामार्गाचे काम सुरू केले होते. आज मी मुख्यमंत्री असताना त्याचे लोकार्पण होते आहे. हा योगायोग आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे, की या महामार्गाला आम्ही बाळासाहेबांचे नाव आम्ही देऊ शकलो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देऊ अशी संकल्पना आम्ही मांडली होती. त्यावेळी सगळ्या गोष्टी त्यावेळी जुळून आल्या आणि आम्ही समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले”असे त्यांनी सांगितले.
तसेच “तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मी एमएमआरडीसी या खात्याचा मंत्री होतो. आपल्याला समृद्धी महामार्ग करायाचा आहे. त्यांनी तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला. त्यावर आम्ही काम करू लागलो. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग बनवण्याचा निर्णय झाला”असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.