Konkan Rain : कोकणात बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती, रायगड, सिंधुदुर्गात नद्या इशारा पातळीवर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांचे पाणी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे तात्पुरते विस्थापन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये कामावारी नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.
रायगड जिल्ह्यात अंबा, पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने नागोठणे व खापोली परिसराला फटका बसला. पनवेल तालुक्यातील आपटा येथेही पूरस्थिती होती. जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. रोहा तालुक्यात भातशेती जलमय झाल्याने लागवडीची कामे खोळंबली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली. मुंबई-गोवा महामार्गावरील भगंसाळ, तेरेखोल आणि पीठढवळ या नद्यांना पूर आला. तेरेखोल नदीला पूर आल्यानंतर आळावडीमध्ये पाणी शिरले होते. दरम्यान आता कोकणात बहुतांश जिल्ह्यात पूरस्थिती, रायगड, सिंधुदुर्गात नद्या इशारा पातळीवर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, राजापूरसह संगमेश्वर शहर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चिपळूणमधून जाणाऱ्या महामार्गाला नदीचे स्वरूप येऊन वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पोलीस ठाणे, अधिकारी व कर्मचारी निवासस्थान तसेच पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी साचले. संगमेश्वर तालुक्यातही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे, तर वाशिष्ठी, कोंदवली आणि मुचकुंदी नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. मंडणगड तालुक्यातील पालघर येथे भारजा नदीची पातळी वाढली आहे. रस्त्यावर दरडी कोसळणे, झाडे पडणे अशा घटना घडल्या आहेत. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.