महाकाल मंदिराच्या गर्भगृहात 'भस्म आरती' दरम्यान आग्नीतांडव; पुजाऱ्यांसह 13 जण जखमी
होळीच्या मुहूर्तावर उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगावर मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली. या घटनेत मंदिराच्या पुजाऱ्यासह 13 जण भाजले. मिळालेल्या माहितीनुसार, भस्म आरतीदरम्यान गुलाल ओतल्यामुळे आग लागली आणि वेगाने पसरली. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, ३ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अपघाताची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत मृणाल मीना आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी उज्जैन अनुकुल जैन करणार आहेत. या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांनी X वर पोस्ट केले आणि सांगितले की मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाबा महाकालकडे प्रार्थना करतो.
आज महाकाल मंदिरात होळी साजरी करण्यासाठी भाविक आले होते. सकाळी भस्म आरती सुरू असताना हा अपघात झाला. या घटनेवेळी मंदिरात हजारो लोक उपस्थित होते. जखमी सेवकाने सांगितले की, पुजारी आरती करत असताना मागून कोणीतरी गुलाल ओतला, जो दिव्यावर पडला. गुलालात रसायन असल्याने आग लागल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर काही लोकांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मंदिराला लागलेल्या आगीत भस्मर्तीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा, चिंतामण गेहलोत यांच्यासह 13 जण जखमी झाले होते. ज्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.