कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा; एकबोटेंचा रामराजे निंबाळकरांवर गंभीरआरोप
प्रशांन्त जगताप, सातारा : फलटणच्या कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जातो, या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची IB ने चौकशी केली असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय कृषी गोसेवा पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे.
मिलिंद एकबोटे म्हणाले की, फलटणच्या कत्तलखान्यातून देशापलीकडील आतंकवाद्यांना पैसे मिळतात ही लाजिरवाणी बाब आहे. या कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असून आर्थिक पुरवठा केला जात आहे. तसेच साताऱ्यात सदर बझार येथे देखील घरोघरी गाई कापल्या जात असून प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. या प्रकरणी IB ने आमदार रामराजेंची चौकशी केली असल्याचा खळबळजनक आरोप एकबोटेंनी केला आहे.
यावेळी प्रतापगड येथील शिवप्रताप दिन आम्ही साजरा करतो. उत्सव साजरा करण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारतो असे सांगत शिवप्रताप दिन साजरा करण्याची परवानगी शासनाकडे मागणार असल्याचे देखिल मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.