आदिवासी महिलेला विवस्त्र मारहाण प्रकरणी सुरेश धस यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे एक आदिवासी महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीने गुंडांच्या मदतीने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप व्हिडिओतील पीडितेने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारावर आमदार सुरेश धस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले सुरेश धस?
आदिवासी पारधी महिलेवरील अत्याचाराचे आरोप हे खोटे आहेत. जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो चुकीच्या पद्धतीने होत आहे. व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. घटना वेगळी असताना वेगळं रूप देण्याचं काम चालू आहे. व्हिडीओचा घटनाक्रम चुकीचा दाखलवला जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मी लेखी मागणी करत आहे”, असं सुरेश धस म्हणाले.
“सोशल माध्यमात अनेक बनावट खाते आहेत. त्या माध्यमातून जाणीवपूर्वक तो व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. हे बनावट खाते कोणी तयार केले याचा तपास करावा. या प्रकरणात योग्य तपास करावा. पोलिसांनी यात वेळ घालून तात्काळ योग्य कारवाई करावी”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
मी अनुसूचित जाती-जमाती परिषदेवर काम केले आहे. त्यामुळे मी भावनांचा आदर करतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी असं कसं करू शकले? मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी”, असं आमदार सुरेश धस म्हणाले