कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खड्ड्यावर रॅपीड कॉंक्रीटचा प्रयोग
कल्याण (अमजद खान) : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वच थरातून टीकेची झोड उठवली जात आहे. अखेर गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान पेव्हर ब्लॉक, खडी, मुरुम, कोल्ड मिक्स याद्वारे खड्डे भरले जात असले तरी सतत कोसळनाऱ्या पावसामुळे पुन्हा खड्डे डोके काढू लागल्याने आता एका सीमेट कंपनीच्या माध्यमातून शहरातील खड्ड्यावर रॅपिड कॉंक्रीटचा प्रयोग करण्यात आला आहे. (Experiment of rapid concrete on pit in Kalyan Dombivli Municipal Corporation area)
महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे गणेशोत्सवापूर्वी करावीत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे व शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी आज डोंबिवलीतील 90 फुटी रस्त्यावर अल्ट्राटेक कंपनी मार्फत अत्याधुनिक पध्दतीने खड्डे भरण्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. या पद्धतीमध्ये विविध स्पेशल काँक्रीट तयार करुन ते खड्डयामध्ये भरले जाते आणि ते साधारण पणे 45 मिनिटे ते 1 तासात पूर्ण सेट होते. आणि 6 तासानंतर सदर रस्ता वाहतूकीसाठी खुला करता येतो परंतू या पध्दतीने भरलेले खड्डे दिर्घकाल टिकतात अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने आयुक्त डॉ.दांगडे यांना दिली.
सदयस्थितीत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडले जात होते. परंतु, श्री गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे हे डांबरीकरणाने त्वरीत भरण्याची कार्यवाही सुरु केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली. या समयी डोंबिवलीतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता सुनिल वैदय, शैलेश मळेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, जे प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व इतर अधिकारी वर्गअभियंता उपस्थित होते.