कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना सुनावली फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : कतारमधील न्यायालयाने आज नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हेरगिरी प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून प्रतिक्रिया दिली आहे. फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले की, आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध सुरु आहे. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. सर्व काउन्सलर आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल. कतारी अधिकार्यांकडेही हा विषय मांडणार आहे, असे सांगितले आहे.
दरम्यान, हे आठ जण कतारस्थित अल दाहरा कंपनीत काम करतात. वास्तविक, हे आठ भारतीय गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ पासून कतारमध्ये तुरुंगात आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.