अंबरनाथमध्ये स्त्री-रूपातील गणपतीची प्रतिष्ठापना
मयुरेश जाधव|अंबरनाथ: अंबरनाथमध्ये स्त्री रूपातील गणपती म्हणजेच विनायकी देवीची स्थापना करण्यात आलीये. दक्षिण भारतात हे रूप विनायकी, गणेशिनी म्हणून प्रचलित आहे. या वेगळ्या रूपातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सध्या भाविकांची गर्दी होतेय.
विनायकी किंवा गणेशिनी हे गणपतीचं स्त्री रूप म्हणून ओळखलं जातं. विनायकी देवी ही सर्व बाधांची मालकीण म्हणून ओळखली जाते. दक्षिण भारतात विनायकी देवीचं पूजन केलं जातं. याच अनुषंगाने गणेशाचं एक वेगळं रूप अंबरनाथकरांना पाहता यावं, या हेतूनं स्वामी नगरमधील श्री साई गणराया मित्र मंडळाच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात विनायकी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आलीये. विनायकी देवीची ही मूर्ती संपूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आलीये. या स्त्री रूपातील गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अंबरनाथकर गर्दी करत असल्याची माहिती श्री साई गणराया मंडळाचे अध्यक्ष मुथ्थुवेल सुब्रमणी यांनी दिलीये.