दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, BRS नेत्या के कविता यांना घेतलं ताब्यात
दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना ताब्यात घेतलं आहे. ईडीने मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणाशी संबंधीत असलेल्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भारत राष्ट्र समितिच्या आमदार के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतलं. सुप्रीम कोर्टाच्या नोटिशींना उत्तर न दिल्याने के कविता यांच्यावर ही कारवाई करण्यात आली, अशी सूत्रांची माहिती आहे.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर ईडीच्या चौकशीसाठी १६ जानेवारीला के कविता हजर झाल्या नाहीत. मागील वर्षीही याप्रकरणी त्यांची तीनवेळा चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार कविता यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) नेत्या कविता यांनी स्पष्ट केलं होतं की, माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम झालं नाही. भाजप सरकार ईडीचा गैरवापर करत आहे, असा आरोपली कविता यांनी केला होता.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सहभागी असलेला आरोपी अमित अरोराने चौकशीदरम्यान कविता यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर कविता यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. दक्षिण ग्रुपने आम आदमी पक्षाचे नेते विजय नायर आणि इतर नेत्यांना १०० कोटींची लाच दिली होती, असा आरोप ईडीने केला होता. त्यानंतर ११ डिसेंबरला सीबीआयने कविता यांच्या घरी जाऊन याप्रकरणी तपास केला होता.