Sri Lanka crisis : राष्ट्रपती गोटाबाया देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान (Sri Lanka PMO) कार्यालयाने दिली होती. त्या पाठोपाठचं आता राष्ट्रपती राजपक्षे श्रीलंकेतून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी अखेर देश सोडला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हवाई दलाच्या विमानाने देश सोडून निघून गेले आहे. गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवची राजधानी माले येथे दाखल झाले आहेत.
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना मालदीवला जाण्यास इमिग्रेशनसाठी संरक्षण मंत्रालय, सीमाशुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली होती. १३ जुलैच्या पहाटे त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले, अशी माहिती श्रीलंकन हवाई दलाच्या मीडिया संचालकांनी सांगितले. दरम्यान, वेलाना विमानतळावर मालदीव सरकारच्या प्रतिनिधीने त्यांचे स्वागत केल्याचे समजते.
“राष्ट्रपती पळून गेल्याचा मला आनंद नाही. ते तुरुंगात असायला हवे होते, ” असे राष्ट्रपती कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या २५ वर्षीय आंदोलक मलिक डिसूझा यांनी म्हटले आहे. ते गेल्या ९७ दिवसांपासून आंदोलनात सक्रिय आहेत. राजपक्षे यांनी देश उद्ध्वस्त केला आणि आमचा पैसा चोरला. आम्हाला नवीन राष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळेपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
श्रीलंकेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून गेले आहेत. दरम्यान, गोटाबाया यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना माहिती दिली आहे. राष्ट्रपती घोषणेनुसार राजीनामा देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. राष्ट्रपती भवनातील पहिल्या मजल्यावर लाकडी कपाटासमोर गुप्त बंकरचा व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे याच मार्गाद्वारे राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.