ट्विटर विकत घेताच इलॉन मस्क यांनी केली सीईओ पराग अग्रवालांसह अनेक अधिकाऱ्यांची हकालपट्टी
टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये प्लॅटफॉर्मचे प्रमुख असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, आता इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही काढून टाकण्यात आले आहे. परागसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सीएफओ नेड सेगल यांचाही समावेश आहे. वास्तविक, 13 एप्रिल रोजी इलॉन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली. त्यांनी $54.2 प्रति शेअर या दराने $44 बिलियनला हा प्लॅटफॉर्म विकत घेण्याची ऑफर दिली होती.
एलॉन मस्क यांनी ट्वीटरवर ताबा घेताच पहिल्यांदा ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांना ट्विटरच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आल्याचेही वृत्त आहे. ट्विटरच्या कायदेशीर टीमच्या प्रमुख विजया गड्डे यांनाही बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इलॉन मस्कने 8 जुलै रोजी डील संपवण्याचा निर्णय घेतला, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी डील पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. इलॉन मस्क गुरुवारी ट्विटरच्या ऑफिसमध्ये दिसले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
इलॉन मस्क यांनी ट्विटरवर याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, सध्या इतका मोठा धोका आहे की सोशल मीडिया कट्टरपंथी उजवे आणि कट्टरपंथी डावे यांच्यात विभागले जाईल आणि आपल्या समाजात अधिक द्वेष पसरवेल. अधिक क्लिकच्या शोधात, बहुतेक पारंपारिक माध्यम संस्थांनी या कट्टरतावादाला खतपाणी घातले आहे कारण त्यांना वाटते की यातून पैसा येतो.मी ट्विटर का विकत घेतले आणि जाहिरातीबद्दल मला काय वाटते याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यापैकी बहुतेकजणांनी चुकीचा निष्कर्श काढला आहे. असे ते म्हणाले.