वृद्ध महिलेच्या घरी तब्बल 12 वर्षानंतर पोहोचली वीज..
निसार शेख, चिपळून
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी पश्चिम- हसरेवाडी येथील वृद्ध महिलेचे तब्बल १२ वर्षांनंतर प्रकाशमय झाले आहे. घरात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर या वृद्ध महिलेच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. यासाठी आमदार शेखर निकम आणि कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तर याकरिता येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
गेल्या महिनाभरापूर्वी दहिवली मुकनाकवाडी येथील खरात कुटूंबियांचे घर तब्बल ५ वर्षांनंतर प्रकाशमय झाले. ही कामगिरी कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने केली. आता कोळकेवाडी पश्चिम हसरेवाडी येथील बाबी राया शिंगाडे या वृद्ध महिलेच्या घरी वीज पोहोचवली आहे. कोळकेवाडी हसरेवाडी बाबी शिंगाडे यांचे घर गाव वस्तीपासून दूर असल्याने गेली १२ वर्षे ते विजेपासून वंचित होते. ही बाब आमदार शेखर निकम यांच्या येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार निकम यांनी महावितरण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना हा विषय सांगितला. शिंगाडे यांना वीज पुरवठा कसा होईल? यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले. यानंतर महावितरण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. यामध्ये या एका घरासाठी उच्चदाबाच्या वाहिनीचे ११ वीज खांब व २५ एच. पी. चे रोहित्राची आवश्यकता असल्याचे समोर आले आणि सुमारे ६ लाख रुपये खर्च करून शिंगाडे यांच्या घरापर्यंत वीज नेण्यात आली.
रोहित्राचे उद्घाटन आमदार शेखर निकम व कार्यकारी अभियंता कैलास लवेकर तर घरातील वीजेचे उद्घाटन उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. वीज मागणी अर्ज घेऊन लवकरात लवकर वीज देण्याचे काम उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र पालशेतकर, सहा. अभियंता अमोल मस्के यांनी केल्याबद्दल श्रीम. शिंगाडे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे, राजेश चव्हाण, दत्ताराम बंगाल, अमित चव्हाण, रणजित शिंदे, मनोज कदम, सिकंदर कडवेकर, चंद्रकांत कदम, हरी बंगाल लक्ष्मण पवार, अरविंद सागवेकर पश्चिम हसरेवाडी महिला मंडळ अर्चना मोरे, वैष्णवी पवार, वैशाली मोरे, सुरेखा शिंगाडे, वैशाली शिंगाडे आदी उपस्थित होते.