पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची खासदारकी रद्द, पाकिस्तानात खळबळ
पाकिस्तानसह संपूर्ण देशात चर्चेत असणारे वादग्रस्त पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत महत्वाची बातमी येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. आधीच पंतप्रधान पदावरून पाय उतार झालेल्या इम्रान खान यांची खासदारकीही रद्द झाली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इम्रान खान मोठ्या अडचणीत सापडले आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेत असताना परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून राजकीय पदासाठी अपात्र ठरविले. इम्रान खानला कलम 63(i)(iii) अंतर्गत पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे, असे डॉनने वृत्त दिले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय खंडपीठाने इस्लामाबाद येथील ECP सचिवालयात हा निकाल जाहीर केला, असे डॉनने म्हटले आहे.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर इम्रान खान यांना नॅशनल असेंब्लीची जागा गमवावी लागेल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.