शिंदे-भाजप सरकारचा मंत्री मंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला; लवकरच घोषणा होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलच्या फॉर्मुल्यावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं, मात्र सध्या या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोनच पदं असल्यानं विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतेय.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून, याला शिंदे गटानेही सहमती दर्शवल्याचं बोललं जातंय. खातेवाटपावरून शिंदे गटाची काहीशी नाराजी असल्याचं बोललं जात होतं. गुरुवारीच मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही तारीख सांगणं टाळलं होतं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या आता जवळपास ५० पर्यंत गेली असून, त्यांच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत.
दरम्यान, आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. यामुळे भाजपचा मंत्रीमंडळाचा फॉर्मुला हा केंद्रातून ठरणार हे नक्की आहे. शिंदेंसोबत ५० आमदार असले तरी भाजपचे १०५ आमदार असल्यानं सरकारमध्ये त्यांचा वाटा मोठा असणार हे नक्की आहे. त्यात भाजपने शिंदेंना आधीच मुख्यमंत्री पद देऊ केल्यानं मंत्रीमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला चांगले खाते येतील याची शक्यता फार कमी आहे.